समाजाला डावलून भरती प्रक्रिया राबवत असल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाचे आंदोलन | Sakal Media |

2021-04-28 891

सोलापूर : मराठा समाजाला न्याय देऊन भरती प्रक्रिया राबवू, असे आश्‍वासन देऊन मराठा समाजाला डावलून सरकार भरती प्रक्रिया राबवत असल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीने जुनी मिल कंपाउंड येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर बुधवारी सकाळी निदर्शने करण्यात आली.
शासनाने सर्व प्रक्रिया पार करून निवडीसाठी पात्र असणाऱ्या तमाम मराठा उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेणे आवश्‍यक आहे. शासनाने कोरोना काळात ही प्रक्रिया पुढे ढकलली असल्याने, या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या उमेदवारांच्या निवडी ही सर्वस्वी राज्य शासनाची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थगिती उठवण्याबाबत व घटनापीठ स्थापन करण्याबाबत लवकरच सुनावणी होणार असताना जाणीवपूर्वक 2 डिसेंबर रोजी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने कागदपत्रे पडताळणी केली जात आहेत. यामुळे मराठा उमेदवारांमध्ये संतापाची लाट असून, ही पडताळणी प्रक्रिया लांबवून ती सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेनंतर घ्यावी, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
या वेळी सुपर मार्केट येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, प्रियांका डोंगरे, भाऊसाहेब रोडगे, अमोल भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जुनी मिल कंपाउंडमधील विद्युत मंडळाच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.

(व्हिडिओ : अमोल व्यवहारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires